स्वच्छ शहरासाठी संकल्प : कचरा व्यवस्थापनाची सुरूवात करूया घरापासून
नवीन वर्ष म्हणजे नवीन सुरूवात,नव्या आशा आणि नव्याने चांगले काहीतरी करण्याचा संकल्प घेऊन येते. स्वच्छ आणि आरोग्यदायी शहर घडवण्याची हीच एक प्रभावी संधी असून याची सुरूवात आपल्या घरापासूनच करता येऊ शकते. कचरा व्यवस्थापनाच्या सवयींमध्ये साधे,छोटे पण सातत्यपूर्ण बदल केल्यास प्रत्येक कुटुंब हरित आणि स्वच्छ भविष्यात योगदान देऊ शकते. काही सोपे उपाय देखील शहर स्वच्छ ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतात.
कचऱ्याचे वर्गीकरण करून सुरूवात करा : योग्य कचरा व्यवस्थापनासाठी कचऱ्याचे अचूक वर्गीकरण करणे गरजेचे असते. घरात कचरा जमा करण्यासाठी दोन किंवा तीन पेट्या ठेवा - एक ओला कचरा म्हणजे अन्नाचे उरलेले पदार्थ यासाठी,दुसरी पेटी कागद,प्लास्टिक,धातू व काच अशा प्रकारच्या सुका कचऱ्यासाठी आणि तिसरी पेटी बॅटरी व ई-कचरा यांसारख्या घातक वस्तूंसाठी वापरावी. यामुळे पुनर्वापर सुलभ होऊन कचरा वर्गीकरणावरील ताण कमी होतो.
पुनर्वापरापूर्वी कचरा कमी करा : जास्त पुनर्वापर करण्यापेक्षा कमी कचरा निर्माण करणे अधिक चांगले आहे. पुनर्वापर करता येणाऱ्या पिशव्या व पाण्याच्या बाटल्यांचा वापर करा. एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकच्या वस्तू टाळा आणि कमी पॅकेजिंग असलेली उत्पादने निवडा. आवश्यक असलेल्या वस्तूच खरेदी केल्यास कचरा कमी होतो आणि पैसे देखील वाचतात.
स्वयंपाकघरातील कचऱ्याचे खत तयार करा : भाज्यांचे साल, फळांचा कचरा,तसेच चहा-कॉफीचा उरलेला कचरा घरच्या घरी कंपोस्ट करता येतो. कंपोस्टिंगमुळे कचऱ्याचे नैसर्गिक खतामध्ये रूपांतर होते आणि कचऱ्याचे प्रमाण देखील कमी होते.
योग्य पध्दतीने पुनर्वापर करा : पुनर्वापरासाठी पात्र वस्तू टाकण्यापूर्वी त्या स्वच्छ व कोरड्या करा. स्थानिक पुनर्वापर व्यवस्थेत कोणती सामग्री स्विकारली जाते,याची माहिती घ्या. ई-कचऱ्यासाठी अधिकृत संकलन केंद्रे किंवा विशेष संकलन मोहिमांचा वापर करा.
समुदाय स्वच्छतेच्या उपक्रमांना पाठिंबा द्या. परिसरातील स्वच्छता मोहिमांमध्ये सहभागी व्हा.आपल्या सोसायटीत कचरा वर्गीकरणाला प्रोत्साहन द्या आणि स्थानिक पुनर्वापर कार्यक्रमांना साथ द्या.
दररोजच्या छोट्या कृतींमधून मोठा बदल घडू शकतो.या नवीन वर्षाच्या संकल्पातून प्रत्येक घरातून एक स्वच्छ व हरित शहर घडवूया.